Wednesday, May 11, 2022

राज ठाकरे यांना शिव छत्रपतींचा इतिहास गिरविण्याची संधी !

 

Raj Thackeray vs brij bhushan
हिंदुत्व फक्त अयोध्येतच सापडते?

राज ठाकरे यांना सल्ले देण्या इतका मी मोठा नाही. तरी मला हे बोलावसं वाटतंय.


उत्तर प्रदेशचे खासदार श्री. बृजभूषण सिंह यांनी वृत्तवाहिनीवरील उधळलेली मुक्ताफळे ऐकली आणि तळपायाची आग मस्तकात जाऊन राहवले नाही म्हणून हा लेख मी लिहीत आहे.

बृजभूषण म्हणतात - 

१. "राज ठाकरे यांना रोखण्याच्या नियोजनासाठी उत्तर प्रदेश येथे ५० हजार  माणसांची बैठक घेत आहोत त्यात संतांचा देखील समावेश आहे आणि संतांनी देखील राज ठाकरे यांनी अयोध्येत यायचे असल्यास उत्तर भारतीयांची आधी माफी मागावी असं बृजभूषण म्हणाले आहेत" (खरं तर राग, लोभ, मत्सर, द्वेष यांच्याही पलीकडे असतो तोच खरा संत असं माझ्या निदान वाचण्यात तरी आहे) असो.

२. "राज ठाकरे यांनी माफी मागायची वेळ आता निघून गेली आहे, आता आले तरी ते अयोध्येत येऊ शकणार नाही इतकी तयारी आमची झालेली आहे, तर राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याची तारीख बदलावी."

३. आता तर ते राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हणतायत की, "राज ठाकरे दबंग नही चूहा है चूहा. अगर वो माफी नही मांगता है तो जिंदगी में कभी यहां उतर नही पायेगा"

आजपर्यंत महाराष्ट्र हा बहुतांश उत्तर भारतीयांना पोसत आलाय हे सर्वश्रुत आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या अतिक्रमणामूळे भूमीपुत्रांवरील होणाऱ्या अन्यायाची जाणीव वेळोवेळी येथील भूमिपुत्रांना आणि त्यात्या वेळच्या राज्य सरकारला विविध भाषणांमधून आणि न ऐकल्यास विविध आंदोलनातून करून देऊन अन्यायाला वाचा फोडली. असे असले तरी महाराष्ट्रात जे येथे वर्षानुवर्षे राहणारे उत्तर भारतीय आहेत त्यांना कधी विनाकारण मनसेने त्रास दिलेला नाही. त्यांना देखील त्यांनी भूमीपुत्रच मानले आहे. जर राज ठाकरे यांच्या मनात सर्वच उत्तर भारतीयां विषयी आकस असता तर..?

१. मला फक्त एकच सांगा NEET परीक्षेचा प्रश्न काय फक्त मराठी मुलांचाच होता का? यात उत्तर भारतीयांची मुलं नव्हती का?

२. कोरोना काळात कित्येकांवर उपाशी राहायची वेळ आली तेंव्हा सर्वात आधी मदतीचे हात धावून गेले ते मनसेचेच! मदत घेणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय नव्हते का?

३. त्याच कोरोना काळात कित्तेक नागरिकांना विजेची आणि हॉस्पिटल्सची अवाढव्य बिलं आली तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून बिलं कमी करून दिली त्यात उत्तर भारतीय नव्हते का?

४. पक्षाची भूमिका स्पष्ट व्हाव्ही म्हणून उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्वीकारून उत्तर भारतीयांच्या मंचावर त्यांच्या आग्रहाखातर हिंदीत भाषण दिले. विनंती करणारे उत्तर भारतीय नव्हते का? ते भाषण एकादा तरी बृजभूषण यांनी ऐकले आहे का?

५. एवढंच नाही तर स्वतःच्या पक्षात अनेक उत्तर भारतीय मोठ्या पदांवर आहेत. मग मनसे पक्षात उत्तर भारतीय नाहीत असं बृजभूषण यांना वाटते का?

अशी असंख्य उदाहरणे देता येतील. महाराष्ट्राचे ओझं कमी व्हाव्ह हीच राज ठाकरे यांची अपेक्षा होती किंबहुना ती आजही आहेच. जात,पात, धर्म किंवा वर्णभेद अद्याप तरी राज ठाकरे यांनी केलेला निदान माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण जे सत्य आहे ते बोलायचा पुरुषार्थ राज ठाकरे ठेवतात मग परिणाम काहीही असोत. असा नेता सध्याच्या राजकारणात शोधून सापडणार नाही.

म्हणजे या उपऱ्यांनीं महाराष्ट्रात यावं, इथे कोठेही कसंही राहावं, काहीही करावं, भूमिपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या देखील घ्याव्यात आणि वर यांची मुजोरी पण सहन करावी? अरे वाह रे वाह.

बृजभूषण यांनी याचे उत्तर द्यावे.

बृजभूषण यांना मनसे स्थापन झाल्यापासून जर महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर अन्याय झाला किंवा मनसे पक्षाने अन्याय केला असे वाटत असेल आणि जर या वरून राज ठाकरे यांच्या माफीची ते अपेक्षा करीत असतील तर राज ठाकरे यांच्या आधी बृजभूषण यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. कारण आत्तापर्यंत उत्तरप्रदेश मधून येणाऱ्या लोकांचा उपद्रव येथील भूमिपुत्रांना झालाय आणि आजही होतोय.

तसेच पंतप्रधान म्हणून संपूर्ण भारतात तसेच अनेक दिगग्ज नेत्यांनी उत्तरप्रदेशमध्ये वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनसुद्धा उत्तरप्रदेश मधील लोकांना महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी यावं लागतं आणि महाराष्ट्राला त्यांना पोसवं लागत यासाठी बृजभूषण यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आणि उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि तुमच्या लोकांना पोसल्याचा भरपाई म्हणून महाराष्ट्राला परतावाही द्यावा.

वर्षानुवर्षे महाराष्ट्र उत्तर भारतीयांची पोटं भरत आला, त्यांच्या हाताला काम मिळालं तेंव्हा एवढं सर्व महाराष्ट्राकडून घेताना बृजभूषण यांचा आत्मसन्मान आणि उत्तरभारतीय पुळका किंवा खोटे प्रेम कुठे होते?

बृजभूषण यांनी इतकी दबंग भूमिका जर उत्तर प्रदेशच्या लोकहितासाठी वापरली असती तर मला वाटत त्यांच्या वयाच्या अर्ध्या कालावधीत म्हणजेच ३० वर्षांत उत्तरप्रदेशचा विकास नक्की झाला असता. आणि तेथील बेरोजगारांच्या हाताला काम आणि पोटाला आधार मिळाला असता.

तुमचा भार पण सहन करायचा आणि अपमान पण सहन करायचा इतका तरी महाराष्ट्र हतबल नाही.

१. बृजभूषण जर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत यावर चालणारे असतील तर त्यांना १९९२ साली राम मंदिराचा मुद्दा पेटलेला असताना विवादित ढाचा पाडण्याच्या आरोपात बृजभूषण यांना का अटक झाली होती? ज्यांचा ढाचा पाडला होता ते भारतीय किंवा उत्तर भारतीय नव्हते का?

२. बृजभूषण स्वतः सांगतात की, ते जेंव्हा ठेकेदार होते तेंव्हा त्यांच्या मित्रावर जेंव्हा गोळीबार झाला तेंव्हा त्यांनी पिस्तुलीने मित्रावर हल्ला करणाऱ्याला गोळ्या घालून त्याची हत्या केली तो भारतीय किंवा उत्तर भारतीय नव्हता का? 

बृजभूषण जर तुमच्या एका मित्रावर हल्ला झाला म्हणून तुम्ही हत्या करता, तर महाराष्ट्रातील असंख्य भूमीपुत्रांचा रोजगार आणि हक्क डावलले गेल्यावर राज ठाकरे जेंव्हा लोंढे आवरा याबद्दल फक्त बोलतात तेंव्हा उत्तर प्रदेशच्या नेत्यांनी लाठ्याकाठ्या वाटायची भाषा करून आग लावली त्यावेळी राज ठाकरे यांनी काय गप्प बसायला हवं होतं का? 

सुरवात आधी तुमच्या लोकांनी केली मग राज ठाकरे यांनी विटेच उत्तर दगडाने दिले त्यात त्यांची चूक ती काय?

अहो इथे सख्या भावाने जर दुसऱ्या भावाचा हक्क नाकारला तरी कोर्ट कचेऱ्या, खून, मारामाऱ्या होतात ते कशासाठी? स्वतःचे हक्क अबाधित ठेवण्यासाठीच ना मग राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी जे काही केलं ते अयोग्य कसं असू शकेल...? (मी येथे कोणत्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देत नाही, अशा बातम्या आपण वर्तमानपत्रात आणि वृत्तवाहिन्यांमार्फत पाहतच असतो)

मराठी माणसांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनांमुळे राज ठाकरे यांच्यावर कायद्याप्रमाणे गुन्हे नोंद होऊन बऱ्याच केसेस आजही प्रलंबित आहेत. त्यांचा निकाल पुढे काय येईल हे न्यायालयाला ठरवू दे ना. बृजभूषण आपण न्यायालयापेक्षा मोठे नाहीत.

माझा प्रश्न इतकाच आहे कि, बृजभूषण सिंह सारखा महान कर्तुववान आणि दबंग नेता उत्तर भारतीयांना मिळाला असताना उत्तर भारतीयांना रोजीरोटीसाठी वणवण का फिरावं लागतंय? याच आत्मपरीक्षण बृजभूषण यांनी करावं.

बृजभूषण यांना मला आवर्जून सांगावंस वाटतंय. सर्वच उत्तर भारतीयांनी काय राज ठाकरे यांच्यावर प्रेम दाखवलेले नाही. खाली उदहरण देत आहे.


१. काही वर्षांपूर्वी राहुल राज नावाचा बिहारी तरुण पिस्तुल घेऊन मुंबईच्या बसमध्ये घुसून म्हणतो की "में राज ठाकरे को सबक सिखाऊंगा"

राहुल राज एक बिहारी तरुण राज ठाकरे यांना विरोध करायला पिस्तुल घेऊन मुंबईत आला होता...


२. आंदोलन करताना उत्तर भारतीयांकडून सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला होतो अशी असंख्य उदाहरणं दिली तर येथे हा लेख संपता संपणार नाही..

Sushant Malavade Attack
सुशांत माळवदे यांच्यावर उत्तर भारतीयांचा हल्ला.

थोडक्यात सांगायचं तर बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करून उत्तर प्रदेशमध्ये ते हिरो झाले खरे पण कळत न कळत त्यांनी उत्तर भारतीयांच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्राची शान आणि मराठी माणसांची आन-बान आहेत, महाराष्ट्राने आजपर्यंत उत्तरप्रदेशमधील अनेक पाहुण्यांना पोसून देखील जर उत्तर प्रदेशमध्ये देव दर्शनासाठी जाताना म्हणा किंवा राजकीय भूमिकेतून जाताना म्हणा जर या महाराष्ट्राच्या जीवावर जगत असलेल्यांची जर राज ठाकरे यांना माफी मागावी लागणार असेल, तर हा राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमानच आहे. नुसते राज ठाकरेंच नाही तर इतर महाराष्ट्रातला कोणत्याही नेत्याने चूक नसताना उपऱ्यांची माफी मागावी इतके महाराष्ट्रातील नेते हलके नक्कीच नाहीत.

राज ठाकरे यांना आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना माझा भाभडा प्रश्न?

हिंदुत्व हाती घ्यायला कशाला हवी अयोध्या? शपथ घेण्यासाठी महाराष्ट्राची संतांची भूमी कमी आहे का? भक्तीसाठी किंवा प्रामाणिक इच्छेला कोणताही देव किंवा स्थान आडवे येत नाही.

हिंदुत्व घ्यायला अयोध्येत जावं लागत असेल तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपतींनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्याची शपथ का घेतली असेल? याचं उत्तर मी न दिलेलंच बरं. रायरेश्वराच मंदिर म्हणजे काय १२ जोतिर्लिंगांपैकी एक नव्हते. पण ते मंदिर छत्रपतींनी शपथ घेतली म्हणून प्रसिद्ध झाले.

अयोध्या दौऱ्यासाठी अपमानित होण्यापेक्षा राज ठाकरे यांनी पुण्यात बजरंगगबलीची महाआरती केली अगदी तसेच महाराष्ट्रातीलच प्रभू रामचंद्राच्या पवित्र स्थानाचे दर्शन घ्यावे. पंचवटी येथे देखील प्रभू रामचंद्राचे स्थान, सीता गुंफा आहे जिथे प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांनी वनवासात असताना आसरा घेतला होता. तेही अयोध्ये इतकेच महत्वाचे स्थान आहे. मुंबई येथे देखील बाणगंगा आहे.

एवढंच नव्हे तर मुंबई विलेपार्ले पूर्व येथे देखील प्रभू रामचंद्राचे खूप जुने मंदिर आहे. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी मोठा पालखी सोहळा आणि अनेक कार्यक्रम तेथे होतात.

कदाचित मी चुकत नसेल तर या मंदिरात विठुकाका नावाचे जे गृहस्थ आहेत ते जे. जे. आर्ट ऑफ स्कुल मध्ये प्रोफेसर होते. प्रो. विठ्ठल शानबाग हे त्यांचे नाव. ते प्रोफेसर देखील राज ठाकरे यांच्या ओळखीचेच असावेत असा माझा अंदाज आहे.

राज ठाकरे यांच्या निमित्ताने मुंबईत विलेपार्ले सारखी मुंबईत देखील प्रभु रामचंद्राची मंदिरे आहेत हे देखील लोकांना कळेल आणि राज ठाकऱ्यांमुळे त्याला प्रसिद्धी देखील मिळेल.

राज ठाकरे यांनी  हिंदुत्वाचा अनोखा पायंडा पाडावा.

राज  ठाकरे यांनी उपऱ्यांचा अपमान सहन करण्यापेक्षा "हिंदुत्व हाती घ्यायला अयोध्येलाच जावं लागतं" हे खोडून काढून महाराष्ट्रातीलच प्रभू रामचंद्रांच्या स्थानावर जाऊन शिव छत्रपतींच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी आणि महाराष्ट्रात राहून देखील हिंदुत्व हाती घेता येत. हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानाला पटवून देत अनोखा पायंडा पाडावा.

मुंबई महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर हिंदूंना जेंव्हा राज ठाकरे यांची भूमिका पटेल तेंव्हा ते राज ठाकरे यांच नेतृव स्वीकारतीलच. यानंतर जर उत्तर प्रदेश मधून आदरपूर्वक निमंत्रण आले तर तिथेही त्यांनी जरूर जाऊन यावे.

विरोधकांनी रचलेल्या या षड्यंत्राचे सोने करून राज ठाकरे यांनी शिव छत्रपतींचा इतिहास गिरवून महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हिंदू राजकारणाचा इतिहासच बदलावा हीच अपेक्षा आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र...

©मिलिंद पालांडे©

Tuesday, March 31, 2020

घरातच थांब ना थोडे दिवस... कोरोना व्हायरसवर मराठी कविता



हा व्हीडीओ पाहणाऱ्या दर्शकांना माझी एकच विनंती शुल्लक कारणांसाठी घरा बाहेर जावून स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवावर उदार होऊ नका. आपल्याला सर्वांना मिळून हे युद्ध जिंकायचे आहे....
Gharatch Thamb Na Thode Divas Marathi Kavita (Marathi Poem) On Coronavirus 2020 By Mumbaikar Milind






Wednesday, February 26, 2020

माझा राज ठाकरे केंव्हाच अर्पण झालाय या महाराष्ट्राच्या मातीला...




आज दिनांक २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिना निमित्त राज साहेब ठाकरे यांना ही माझी कविता अर्पण करीत आहे... 

Sunday, January 26, 2020

हिंदुत्वच का? मनसे पक्षातील कार्यकर्त्यांची घुसमट होतेय का?



राज ठाकरे यांनी हिंदुत्व हाती काय घेतलं सर्वांच्याच पोटात दुखायला लागलं दुसऱ्याचं जाऊ द्या हो.
राज ठाकरे यांचे हिंदुत्व हाती घेणे हे काही कार्यकर्त्यांनाही आवडलं नसावं किंवा ते संभ्रमात देखील असतील म्हणून हा लेख लिहवासा वाटतोय....

आता मराठी मुद्याचं काय होणार? मराठीसाठी कोण झटणार? आपल्या पक्षात सर्वच जाती धर्माचे लोक आहेत त्यांना काय वाटेल? ते आता आपल्या मनसेत कसे राहतील वगैरे वगैरे.

संपूर्ण भारतावर खूप काळ मोघलांनी राज्य केलं ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. मोघलांनी जनतेचा अमानुष छळ केला.

म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचाही समावेश होता.

छत्रपतींनी कधी कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा अपमान केला नाही.. किंवा हिंदवी स्वराज्य स्थापन करतोय म्हणून मुसलमानांवर अत्याचार केले नाहीत. उलट छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याशी प्रामाणिक असलेल्या मुसलमानांनाही त्यांनी आपलेसे केले होते आणि त्या मुसलमानांनी देखील छत्रपतींना रयतेचा राजा म्हणून स्वीकारले होते..

भारताला अकबर, टिपू सुलतान यांच्या सारखे राजे देखील लाभले आहेत अशी असंख्य उदाहरणे देता येतील ज्यात अनेक मुसलमान राजांनी देखील कोणत्याही धर्माचा अपमान केला नाही म्हणूनच आज इतिहासात त्यांची महान योद्धे म्हणून नोंद झाली आहे.

अश्या योध्यांना सर्व जाती धर्मातील रयतेची साथ लाभली मग ते राजे धर्माने कोणीही असोत. मुसलमानांनी देखील येथील मातीसाठी आपले बलिदान दिले आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही.

टीप- येथे मी कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही योध्याशी तुलना करीत नाही, फक्त उदाहरण म्हणून देत आहे.. कारण कोणत्याही योध्याशी कुणाचीही बरोबरी होऊ शकत नाही.. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा नकोत म्हणूनच इतिहास असतो इतिहासातून जे चांगले आहे ते घ्यावे आणि जे वाईट आहे ते सोडावे..

पण आजकालची जनताही तशी राहिली नाही ना आजकालचे राजकारणी.. 

"आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय" अशी गत जनतेची झाली आहे...

जनतेच्या भावनेला हात घालून आपले काम साध्य करून घ्यायचे मग जनता मरो की जगो त्याच नेत्यांना काही घेणं देणं नसते.. असे आजकालचे राजकारणी लोक आहेत..

म्हणूनच येथे म्हणावेसे वाटते की "पूर्वीचे नेते राजनेते होते जे राजनीती करायचे, हल्लीचे नेते राजकारण करतात म्हणून ते राजकारणी म्हणून ओळखले जातात..."

तुम्ही अगदी तुमच्या मनावर हात ठेवून सांगा तुम्हाला तुमच्या जातीचा किंवा तुमच्या धर्माचा आरक्षणा व्यतिरिक्त किती फायदा झाला आहे..? कोणता धर्म हिंसा करा असे सांगतो? निसर्गाने कधी जात धर्म पाहून भेदभाव केला आहे का? तो सर्वांनाच सारखा ठेवतो ना? मग राजकारणात असे का होते ते आपण जाणून घेऊया..

सर्वसामान्यांच्या जीवनापेक्षा राजकारणी लोकांचं जीवन खूप वेगळे असते. त्यात भावनेला थारा नसतो आणि ते भावनिक झाले तरी ते फक्त राजकारणासाठीच. काहीच राजकारणी हे प्रामाणिक असतात आपल्या तत्वांशी कधीच तडजोड करीत नाहीत..

राजकारणी लोक इतके बुद्धीने तल्लख आणि हुशार असतात की त्यांना माहीत असते की लोकांना काय हवंय! ते आणि तेच ते जनतेला पुरवतात.. उदा.. 

१. पैसे वाटणे, दारू आणि मटणाच्या मेजवान्या ठेवणे, एखादा मुद्दा उचलून कार्यकर्त्यांना भडकवून त्यांच्या मार्फत आपले काम साधून घेणे मग त्या कार्यकर्त्यांचे काहीही होवो.

२. नेत्यांनी खांद्यावर हात टाकून फोटो काढला की कार्यकर्ते त्या नेत्याला डोक्यावर घेतात. त्यात त्या नेत्याचा मोठेपणा दिसतो तर कार्यकर्त्याला त्या एका फोटोने समाजात स्थान मिळते.

३. कार्यकर्त्यांच्या मोठमोठ्या चूकीच्या भूमिकेला देखील पाठीशी घालणे.

४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोलायचे एक आणि करायचे एक असे वागणे.

४. जातीपातिचे नीच राजकारण खेळून, दंगे घडवून त्यावर सतत चर्चेत राहणे वगैरे वगैरे...

पण राज ठाकरे यांच्या बाबतीत तरी वरील सर्व गोष्टी आज पर्यंत तरी खोटे ठरत आलेल्या आहेत. उदा...

१. राज ठाकरे ह्यांनी कधीही गर्दी जमविण्यासाठी किंवा मतदानासाठी दारूच्या आणि मटणाच्या पार्ट्या किंवा पैश्यांचे वाटप केलेलं माझ्या पाहण्यात किंवा ऐकविण्यात नाही.

२. मराठीच्या मुद्यांवर त्यांनी प्रखरतेने बाजू मांडत कार्यकर्त्यांना आणि मराठी जनतेला जागे केले, त्यासाठी अनेक आंदोलने झाली आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर केसेस पडल्या. हे जरी खरं असले तरी राज ठाकरे यांच्यावरही शंभरहुन अधिक केसेस आहेत ह्यावरून स्पष्ट होते की त्यांनी नुसत्या कार्यकर्त्यांनाच कोर्ट कचेरीत अडकवले नाही तर त्या भूमिकेत ते स्वतःही कार्यकर्त्यांप्रमाणेच तितकेच मराठीसाठी झटत राहिले आहेत हे सिद्ध होते.

३. जेंव्हा कार्यकर्ते त्यांना भेटायच्या निमित्ताने येतात तेंव्हा सर्वांनाच फोटो काढण्याचा मोह होतो.. तेंव्हा "माझ्याकडे यायचं असेल तर काम घेऊन या, फोटो काढण्यासाठी नको." "तुम्ही असं काहीतरी चांगलं काम करा की मला तुमच्या सोबत फोटो काढवासा वाटेल" असं भर सभेत कार्यकर्त्यांना सांगणारा एकही नेता तुम्ही तरी पहिला आहे का?..

४. चुकीची भूमिका घेणाऱ्यां पदाधिकाऱ्यांना ही त्यांनी कधीच पाठीशी घातले नाही हे त्यांच्या २३ जानेवारीच्या सभेत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर होणाऱ्या वादांवर आपली भूमीका स्पष्ट करीत झापले. ते स्पष्ट म्हणाले की "सोशल मीडियावर कोणताही पदाधिकारी आपापसात वाद घालताना आढळला तर तो कोणीही असो त्याला लगेच पदावरून हटविले जाईल" असं ठामपणे बोलणारा कोणता ही नेता तुम्ही तरी पहिला आहे का?

५. जातीपतींचं राजकारण त्यांनी कधीच केले नाही, उलट लोकांना सांगत आले की "माझ्या महाराष्ट्रातील मुसलमान जिथे राहतो तिथे कधीच दंगली घडणार नाहीत" फक्त जे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विरोधात बोलतात किंवा कृत्य करतात त्यांंनाच त्यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

६. जे ते बोलले त्यावरून त्यांनी कधीच माघार घेतली नाही जे बोलले ते बोलले त्यांचे शब्द त्यांनी कधीच फिरविले नाही नाशिक महानगर पालिकेमध्ये त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी, चांगले प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेले परंतु त्या बदल्यात पुढील निवडणुकीत त्यांना शेवटी हारच पत्करावी लागली.

शेवटी राज ठाकरे ९ मार्च २०१७ मध्ये मनसेच्या ११व्या वर्धापन दीनात राज ठाकरे म्हणाले की आज "काम हरले आणि पैसा जिंकला" आणि त्यानंतर हे ही म्हणाले की "ज्यांनी मनसेला मतदान केलं त्यांचे आभार परंतु जनतेला काम दाखवून पण ज्या जनतेने मनसेला मतदान केले नाही त्यांनी मला शिकवले की निवडणूक कशी लढवायची असते"... 

त्यावेळी काय म्हणाले होते राज ठाकरे..👇



एखादा सतत प्रामाणिकपणाने चांगले काम करीत असेल आणि त्याला मोबदल्यात जर सारखा पराभवच मिळत असेल तर त्या प्रामाणिकपणाचे करायचे काय? तुम्ही एकदा तरी स्वतःला राज ठाकरे यांच्या जागी ठेवून पहा आणि मग विचार करा...

जास्तीत जास्त मतदार जात, धर्म, पैसा पाहूनच मतदान करतात, मतदारांनी केलेल्या विकासाच्या कामांवर मतदान केले असते तर, राज ठाकरेंनी कशाला झेंडा बदलून हिंदुत्व हाती घेतले असते..?

मग राज ठाकरे यांच्यावर अजेंडा आणि झेंडा बदलल्यावर टीका करण्यात काय तथ्य आहे? हे प्रत्येकाने विचारात घेतले पाहिजे..

हिंदुत्व पेक्षा रस्ते, वीज, पाणी हे मुद्दे गरजेचे आहेत हे जरी खरं असलं तरी लोक जर मतदान धर्म आणि जातींवरच करणार असतील तर माझ्या मते तरी राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्यच वाटतो.. कारण जनतेला जे हवाय तेच ते करत आहेत मग यात गैर ते काय? राजकारणात जनतेला जे हवं आहे तेच द्यावं कारण युद्धात सर्व माफ असतं.

आजकाल ज्याला "हिंदू" या शब्दाचा अर्थ देखील माहीत नाही तो ही राज ठाकरे यांच्यावर आग पाखड करायला सज्ज आहे..

हिंदुत्व हाती घेणे म्हणजे मराठीचा मुद्दा सोडणे असे होत नाही आणि हिंदुत्व हाती घेणे म्हणजे मुसलमानांवर अत्याचार करणे असाही होत नाही..

मग मनसेला आणि राज ठाकरे यांना मानणारे मराठी किंवा मुसलमान जनतेने किंवा कार्यकर्त्यांनी नाराज व्हायचे कशाला?

राज ठाकरे सारखा प्रामाणिक, कर्तृत्ववान, वैचारिक आणि तल्लख बुद्धी असलेला नेता महाराष्ट्राला आणि मनसे पक्षाला लाभला आहे याहून भाग्य तो काय?

अश्या नेत्याने जर हिंदुत्व हाती घेतले असेल, तर नक्कीच ते कोणत्याही मुसलमानांवर आणि कोणत्याही मराठी किंवा अमराठी हिंदूंवर उगाच आपली धगधगती तोफ डागणार नाहीत निदान इतका विश्वास तरी प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी माणसांनी, महाराष्ट्रातील हिंदू मुसलमान कार्यकर्त्यांनी तरी ठेवलाच पाहिजे.

मित्रांनो तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल पण अख्खा महाराष्ट्र तुम्हाला एक महाराष्ट्र सैनिक म्हणूनच ओळ्खतोय..

तुमची ओळख ही राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेमुळे आहे आहे हे कधीच विसरू नका.

म्हणूनच चिंता सोडा आणि सन्मानीय हिंदुहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचे कार्य आपल्या हातून घडो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना... जय हिंद जय महाराष्ट्र..


                                                    ©मिलिंद पालांडे©

Wednesday, February 15, 2017

महाराष्ट्रातील सर्व पक्षांना रुळावर आणणारा एक प्रामाणिक मराठी नेता



मी मिलिंद पालांडे हे लिहितोय ते फक्त आणि फक्त एक सर्व साधारण मतदार नागरिक म्हणून. एक मतदार नागरिक म्हणून मला काय वाटतंय ते मी येथे मांडतोय. मी जे मांडतोय ते कदाचित तुम्ही पण हे अनुभवलं देखील असेल...
महाराष्ट्रातील काही पक्षांना एके काळी असा गैरसमज झाला होता की आपल्या वाचून मुंबई महाराष्ट्रातील नागरिकांचे काही भलं होणार नाही आणि जातील तर जातीले कुठे ? फार फार तर थोडे दिवस आपल्या नावाने बडबडत आणि गप्प बसतील.

पुन्हा निवडणूक आली की येतील आपलेच पाय चाटायला. त्यातूनच जर एखाद्याने आवाज उठवलाच कि त्याला साम दाम दंड भेद वापरून गार करायच म्हणजे झालं काम त्यांचं.
वर्षानुवर्षे हाच नागरिक मूग गिळून गप्प राहायचा, अन्याय सहन करायचा आणि पुन्हा निवडणूक आली की मतदार नेहमी प्रमाणेच म्हणायचे आपलाच माणूस आहे रे जाऊ दे दुसऱ्या कुणाला मत देण्यापेक्षा मराठी आहे ना म्हणून मतदान करायचा..
अहो पण त्या नागरिकाला मिळालं काय?? विकास का?
विकास?? तो तर मतदारांच्याया कित्येक पिढ्यांनी बघितला नाही पण सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या तिजोऱ्या मात्र अगदी ठासून भरल्या..
पण आज परिस्थिती बदलली आहे.. ती कुणामुळे?? ते ही समजून घ्या..
वर्ष २००६ एका तरुण तडफदार मराठी नेत्याने स्वतःचा हक्काच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून मनात ठाम आत्मविश्वास आणि मूठभर सहकारी बरोबर घेऊन स्वतःचा नवीन पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढला आणि ते म्हणजेच तुमचे आमचे मराठी हृदय सम्राट माननीय राज साहेब ठाकरे..
एवढी वर्षे सतत अन्याय सहन करणारा,जागो जागी नोकरीसाठी परप्रांतीयांमुळे लाथा खाणारा, आपल्याच घरात परका,लाचार झालेला मराठी माणूस आणि त्याचा मराठी बाणा आज जागृत झाला तो फक्त राज साहेब तुमच्याच मुळे जणू काही एखाद्या निष्प्राण शरीरात प्राण यावेत अगदी तसेच...
ह्या आधी कोण विचारत होत हो मराठी माणसाला? आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना? पण साहेब तुम्ही पाठीशी उभे राहिलात ह्या मुंबई महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या आणि सांगितलंत की "अन्याय दिसेल तिथे लाथ मारा आदेशाची वाट पाहू नका" आणि काय चमत्कार! त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हा आम्हाला आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात पाहायला मिळतायत..
अहो इथे माजलेल्या सत्ता धारी सोडा पण साध्या नगर सेवकालाही प्रश्न विचारायला ही लोक घाबरत होते. पण साहेब जेंव्हा पासून तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केलात अगदी त्याच दिवसा पासून त्रासलेल्या समस्त मराठी जनांना मराठीचा वाली मिळाला. माजलेल्या सत्ता धाऱ्यांना त्यांचा माज उताराविण्यास मराठी माणसा सकट इतर नागरिकांनाही वाव मिळाला.. आज कुठल्या हि पक्षाचा उमेदवार जरी दारात आला तरी लोक त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतात कि आमच्यासाठी इतकी वर्षे काय केलात ते आधी दाखवा? आणि मग मतांचे बोला..
आज जी विकासाची चढाओढ लागलीय ती फक्त राज साहेब तुमच्यामुळेच.
स्वतः सत्तेत असून विकास का नाही झाला? ह्याची जबाबदारी तर सोडा पण त्याची खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडणाऱ्या मुजोर राजकीय पक्षांना विकासावर खोटं का होईना! पण बोलायला राज साहेब आपण भाग पाडलेत.
जो तो दारात येतोय मराठी अस्मिता घेऊन, विकासाची गाजर घेऊन तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा घेऊन, टीव्ही, युट्युब ,फेसबुक व्हाट्सअपवर जाहिराती दाखवून.

पण मला ह्या महामूर्खांना एकचं प्रश्न विचारायचा आहे की अरे ठोंब्यांनो तुम्हीच होतात ना सत्तेत? दिली होती ना एवढी वर्षे? मग इतकी वर्षे केलात काय? होतात कुठे? गाजारांची शेती करत होतात का? की गाजर पुढे दाखवण्यासाठी उपयोगी पडतील म्हणून गाजरं उपटत होतात?
असो ही मंडळी काय सुधारणार नाहीत. सुधारायला मतदारांना म्हणजेच येथील नागरिकांनाच हवे. म्हणूनच मी माझ्या पासूनच सुरवात केलीय ती २००६ मध्ये. मनसेची आमच्या विभागात बांधणी करण्याचा माझा घेतलेला निर्णय यशस्वी ठरला मला माझा प्रामाणिक नेता भेटला. मी तर महाराष्ट्र सैनिक झालो.पण तुमचं काय??
राज साहेब खरंतर तुम्ही पक्ष स्थापनेला खूप उशीरच केलात.. जरा आधी केला असतात तर ह्या मुजोर लोकांना लवकर जाग तरी आली असती आणि जे वीज,पाणी,घर,आरोग्य अश्या सुखसुविधा न मिळालेल्यामुळे जे मराठी माणसांचे स्थलांतर झालेय ते तरी नसते झाले.. पण असो प्रत्येक गोष्टींची वेळ यावी लागते असे म्हणतात ना ते ही बरोबरच आहे..
माननीय राज साहेब आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला दाखविलात कि विकास म्हणजे काय? विकास पर्यावरणाची काळजी घेत कसा करायचा आणि पाणी,वीज,आरोग्य आणि घर ह्या मूलभूत सुविधा सोडून त्याही पलीकडे काही जग असत हे तुम्ही स्वतः नाशिक मध्ये अगदी नाशिकची महानगर पालिका कोट्यवधी रुपयांत कर्जबाजारी असूनसुद्धा ते कर्ज फेडून विकास कामे केलीत आणि तेही फक्त ५ वर्षांत ना भूतो ना भाविष्यतो करून दाखविलात...
आणि म्हणूनच इतर पक्षांना आता राजकारणात टिकायचे असेल तर विकास कामे करून दाखविले पाहिजे. नाही तर मतदार त्यांनीच दिलेल्या गाजरांचा उपयोग त्यांच्यावर कुठे आणि कसा करतील हे त्यांचं त्यांनाच सांगता येणार नाही हे त्यांना आज कळून चुकलंय...
जाता जाता फक्त एवढंच सांगतोय कि ह्या किंवा पुढील भविष्यात येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीचा निर्णय काहीही असो "विजय हा फक्त तुमचाच आहे राज साहेब फक्त तुमचाच" कारण जो कोणी सत्तेत येईल त्याला तुमच्या सारखी टिकाऊ कामे आणि नयनदीप कामे करून दाखवावी लागतील. जर तसे झाले नाही तर मनसे आहेच तयार... आता काम करा किंवा मरा म्हणजेच सत्ता सोडा हाच हिशोब..

आणि म्हणूनच "विजय हा फक्त आणि फक्त तुमचाच आहे राज साहेब फक्त तुमचाच" ..धन्यवाद...मनसे जय महाराष्ट्र...
                                     ©मिलिंद पालांडे©