 |
| हिंदुत्व फक्त अयोध्येतच सापडते? |
राज ठाकरे यांना सल्ले देण्या इतका मी मोठा नाही. तरी मला हे बोलावसं वाटतंय.
उत्तर प्रदेशचे खासदार श्री. बृजभूषण सिंह यांनी वृत्तवाहिनीवरील उधळलेली मुक्ताफळे ऐकली आणि तळपायाची आग मस्तकात जाऊन राहवले नाही म्हणून हा लेख मी लिहीत आहे.
बृजभूषण म्हणतात -
१. "राज ठाकरे यांना रोखण्याच्या नियोजनासाठी उत्तर प्रदेश येथे ५० हजार माणसांची बैठक घेत आहोत त्यात संतांचा देखील समावेश आहे आणि संतांनी देखील राज ठाकरे यांनी अयोध्येत यायचे असल्यास उत्तर भारतीयांची आधी माफी मागावी असं बृजभूषण म्हणाले आहेत" (खरं तर राग, लोभ, मत्सर, द्वेष यांच्याही पलीकडे असतो तोच खरा संत असं माझ्या निदान वाचण्यात तरी आहे) असो.
२. "राज ठाकरे यांनी माफी मागायची वेळ आता निघून गेली आहे, आता आले तरी ते अयोध्येत येऊ शकणार नाही इतकी तयारी आमची झालेली आहे, तर राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याची तारीख बदलावी."
३. आता तर ते राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हणतायत की, "राज ठाकरे दबंग नही चूहा है चूहा. अगर वो माफी नही मांगता है तो जिंदगी में कभी यहां उतर नही पायेगा"
आजपर्यंत महाराष्ट्र हा बहुतांश उत्तर भारतीयांना पोसत आलाय हे सर्वश्रुत आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या अतिक्रमणामूळे भूमीपुत्रांवरील होणाऱ्या अन्यायाची जाणीव वेळोवेळी येथील भूमिपुत्रांना आणि त्यात्या वेळच्या राज्य सरकारला विविध भाषणांमधून आणि न ऐकल्यास विविध आंदोलनातून करून देऊन अन्यायाला वाचा फोडली. असे असले तरी महाराष्ट्रात जे येथे वर्षानुवर्षे राहणारे उत्तर भारतीय आहेत त्यांना कधी विनाकारण मनसेने त्रास दिलेला नाही. त्यांना देखील त्यांनी भूमीपुत्रच मानले आहे. जर राज ठाकरे यांच्या मनात सर्वच उत्तर भारतीयां विषयी आकस असता तर..?
१. मला फक्त एकच सांगा NEET परीक्षेचा प्रश्न काय फक्त मराठी मुलांचाच होता का? यात उत्तर भारतीयांची मुलं नव्हती का?
२. कोरोना काळात कित्येकांवर उपाशी राहायची वेळ आली तेंव्हा सर्वात आधी मदतीचे हात धावून गेले ते मनसेचेच! मदत घेणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय नव्हते का?
३. त्याच कोरोना काळात कित्तेक नागरिकांना विजेची आणि हॉस्पिटल्सची अवाढव्य बिलं आली तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून बिलं कमी करून दिली त्यात उत्तर भारतीय नव्हते का?
४. पक्षाची भूमिका स्पष्ट व्हाव्ही म्हणून उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्वीकारून उत्तर भारतीयांच्या मंचावर त्यांच्या आग्रहाखातर हिंदीत भाषण दिले. विनंती करणारे उत्तर भारतीय नव्हते का? ते भाषण एकादा तरी बृजभूषण यांनी ऐकले आहे का?
५. एवढंच नाही तर स्वतःच्या पक्षात अनेक उत्तर भारतीय मोठ्या पदांवर आहेत. मग मनसे पक्षात उत्तर भारतीय नाहीत असं बृजभूषण यांना वाटते का?
अशी असंख्य उदाहरणे देता येतील. महाराष्ट्राचे ओझं कमी व्हाव्ह हीच राज ठाकरे यांची अपेक्षा होती किंबहुना ती आजही आहेच. जात,पात, धर्म किंवा वर्णभेद अद्याप तरी राज ठाकरे यांनी केलेला निदान माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण जे सत्य आहे ते बोलायचा पुरुषार्थ राज ठाकरे ठेवतात मग परिणाम काहीही असोत. असा नेता सध्याच्या राजकारणात शोधून सापडणार नाही.
म्हणजे या उपऱ्यांनीं महाराष्ट्रात यावं, इथे कोठेही कसंही राहावं, काहीही करावं, भूमिपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या देखील घ्याव्यात आणि वर यांची मुजोरी पण सहन करावी? अरे वाह रे वाह.
बृजभूषण यांनी याचे उत्तर द्यावे.
बृजभूषण यांना मनसे स्थापन झाल्यापासून जर
महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर अन्याय झाला किंवा मनसे पक्षाने अन्याय
केला असे वाटत असेल आणि जर या वरून राज ठाकरे यांच्या माफीची ते अपेक्षा करीत
असतील तर राज ठाकरे यांच्या आधी बृजभूषण यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. कारण आत्तापर्यंत उत्तरप्रदेश मधून येणाऱ्या लोकांचा
उपद्रव येथील भूमिपुत्रांना झालाय आणि आजही होतोय.
तसेच
पंतप्रधान म्हणून संपूर्ण भारतात तसेच अनेक दिगग्ज नेत्यांनी उत्तरप्रदेशमध्ये वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनसुद्धा उत्तरप्रदेश
मधील लोकांना महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी यावं लागतं आणि महाराष्ट्राला त्यांना
पोसवं लागत यासाठी बृजभूषण यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आणि उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि तुमच्या लोकांना पोसल्याचा भरपाई म्हणून महाराष्ट्राला परतावाही द्यावा.
वर्षानुवर्षे महाराष्ट्र उत्तर भारतीयांची पोटं भरत आला, त्यांच्या हाताला काम मिळालं तेंव्हा एवढं सर्व महाराष्ट्राकडून घेताना बृजभूषण यांचा आत्मसन्मान आणि उत्तरभारतीय पुळका किंवा खोटे प्रेम कुठे होते?
बृजभूषण यांनी इतकी दबंग भूमिका जर उत्तर प्रदेशच्या लोकहितासाठी वापरली असती तर मला वाटत त्यांच्या वयाच्या अर्ध्या कालावधीत म्हणजेच ३० वर्षांत उत्तरप्रदेशचा विकास नक्की झाला असता. आणि तेथील बेरोजगारांच्या हाताला काम आणि पोटाला आधार मिळाला असता.
तुमचा भार पण सहन करायचा आणि अपमान पण सहन करायचा इतका तरी महाराष्ट्र हतबल नाही.
१. बृजभूषण जर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत यावर चालणारे असतील तर त्यांना १९९२ साली राम मंदिराचा मुद्दा पेटलेला असताना विवादित ढाचा पाडण्याच्या आरोपात बृजभूषण यांना का अटक झाली होती? ज्यांचा ढाचा पाडला होता ते भारतीय किंवा उत्तर भारतीय नव्हते का?
२. बृजभूषण स्वतः सांगतात की, ते जेंव्हा ठेकेदार होते तेंव्हा त्यांच्या मित्रावर जेंव्हा गोळीबार झाला तेंव्हा त्यांनी पिस्तुलीने मित्रावर हल्ला करणाऱ्याला गोळ्या घालून त्याची हत्या केली तो भारतीय किंवा उत्तर भारतीय नव्हता का?
बृजभूषण जर तुमच्या एका मित्रावर हल्ला झाला म्हणून तुम्ही हत्या करता, तर महाराष्ट्रातील असंख्य भूमीपुत्रांचा रोजगार आणि हक्क डावलले गेल्यावर राज ठाकरे जेंव्हा लोंढे आवरा याबद्दल फक्त बोलतात तेंव्हा उत्तर प्रदेशच्या नेत्यांनी लाठ्याकाठ्या वाटायची भाषा करून आग लावली त्यावेळी राज ठाकरे यांनी काय गप्प बसायला हवं होतं का?
सुरवात आधी तुमच्या लोकांनी केली मग राज ठाकरे यांनी विटेच उत्तर दगडाने दिले त्यात त्यांची चूक ती काय?
अहो इथे सख्या भावाने जर दुसऱ्या भावाचा हक्क नाकारला तरी कोर्ट कचेऱ्या, खून, मारामाऱ्या होतात ते कशासाठी? स्वतःचे हक्क अबाधित ठेवण्यासाठीच ना मग राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी जे काही केलं ते अयोग्य कसं असू शकेल...? (मी येथे कोणत्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देत नाही, अशा बातम्या आपण वर्तमानपत्रात आणि वृत्तवाहिन्यांमार्फत पाहतच असतो)
मराठी माणसांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनांमुळे राज ठाकरे यांच्यावर कायद्याप्रमाणे गुन्हे नोंद होऊन बऱ्याच केसेस आजही प्रलंबित आहेत. त्यांचा निकाल पुढे काय येईल हे न्यायालयाला ठरवू दे ना. बृजभूषण आपण न्यायालयापेक्षा मोठे नाहीत.
माझा प्रश्न इतकाच आहे कि, बृजभूषण सिंह सारखा महान कर्तुववान आणि दबंग नेता उत्तर भारतीयांना मिळाला असताना उत्तर भारतीयांना रोजीरोटीसाठी वणवण का फिरावं लागतंय? याच आत्मपरीक्षण बृजभूषण यांनी करावं.
बृजभूषण यांना मला आवर्जून सांगावंस वाटतंय. सर्वच उत्तर भारतीयांनी काय राज ठाकरे यांच्यावर प्रेम दाखवलेले नाही. खाली उदहरण देत आहे.
१. काही वर्षांपूर्वी राहुल राज नावाचा बिहारी तरुण पिस्तुल घेऊन मुंबईच्या बसमध्ये घुसून म्हणतो की "में राज ठाकरे को सबक सिखाऊंगा"
राहुल राज एक बिहारी तरुण राज ठाकरे यांना विरोध करायला पिस्तुल घेऊन मुंबईत आला होता...
२. आंदोलन करताना उत्तर भारतीयांकडून सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला होतो अशी असंख्य उदाहरणं दिली तर येथे हा लेख संपता संपणार नाही..
 |
| सुशांत माळवदे यांच्यावर उत्तर भारतीयांचा हल्ला. |
थोडक्यात सांगायचं तर बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करून उत्तर प्रदेशमध्ये ते हिरो झाले खरे पण कळत न कळत त्यांनी उत्तर भारतीयांच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्राची शान आणि मराठी माणसांची आन-बान आहेत, महाराष्ट्राने आजपर्यंत उत्तरप्रदेशमधील अनेक पाहुण्यांना पोसून देखील जर उत्तर प्रदेशमध्ये देव दर्शनासाठी जाताना म्हणा किंवा राजकीय भूमिकेतून जाताना म्हणा जर या महाराष्ट्राच्या जीवावर जगत असलेल्यांची जर राज ठाकरे यांना माफी मागावी लागणार असेल, तर हा राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमानच आहे. नुसते राज ठाकरेंच नाही तर इतर महाराष्ट्रातला कोणत्याही नेत्याने चूक नसताना उपऱ्यांची माफी मागावी इतके महाराष्ट्रातील नेते हलके नक्कीच नाहीत.
राज ठाकरे यांना आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना माझा भाभडा प्रश्न?
हिंदुत्व हाती घ्यायला कशाला हवी अयोध्या? शपथ घेण्यासाठी महाराष्ट्राची संतांची भूमी कमी आहे का? भक्तीसाठी किंवा प्रामाणिक इच्छेला कोणताही देव किंवा स्थान आडवे येत नाही.
हिंदुत्व घ्यायला अयोध्येत जावं लागत असेल तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपतींनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्याची शपथ का घेतली असेल? याचं उत्तर मी न दिलेलंच बरं. रायरेश्वराच मंदिर म्हणजे काय १२ जोतिर्लिंगांपैकी एक नव्हते. पण ते मंदिर छत्रपतींनी शपथ घेतली म्हणून प्रसिद्ध झाले.
अयोध्या दौऱ्यासाठी अपमानित होण्यापेक्षा राज ठाकरे यांनी पुण्यात बजरंगगबलीची महाआरती केली अगदी तसेच महाराष्ट्रातीलच प्रभू रामचंद्राच्या पवित्र स्थानाचे दर्शन घ्यावे. पंचवटी येथे देखील प्रभू रामचंद्राचे स्थान, सीता गुंफा आहे जिथे प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांनी वनवासात असताना आसरा घेतला होता. तेही अयोध्ये इतकेच महत्वाचे स्थान आहे. मुंबई येथे देखील बाणगंगा आहे.
एवढंच नव्हे तर मुंबई विलेपार्ले पूर्व येथे देखील प्रभू रामचंद्राचे खूप जुने मंदिर आहे. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी मोठा पालखी सोहळा आणि अनेक कार्यक्रम तेथे होतात.
कदाचित मी चुकत नसेल तर या मंदिरात विठुकाका नावाचे जे गृहस्थ आहेत ते जे. जे. आर्ट ऑफ स्कुल मध्ये प्रोफेसर होते. प्रो. विठ्ठल शानबाग हे त्यांचे नाव. ते प्रोफेसर देखील राज ठाकरे यांच्या ओळखीचेच असावेत असा माझा अंदाज आहे.
राज ठाकरे यांच्या निमित्ताने मुंबईत विलेपार्ले सारखी मुंबईत देखील प्रभु रामचंद्राची मंदिरे आहेत हे देखील लोकांना कळेल आणि राज ठाकऱ्यांमुळे त्याला प्रसिद्धी देखील मिळेल.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अनोखा पायंडा पाडावा.
राज ठाकरे यांनी उपऱ्यांचा अपमान सहन करण्यापेक्षा "हिंदुत्व हाती घ्यायला अयोध्येलाच जावं लागतं" हे खोडून काढून महाराष्ट्रातीलच प्रभू रामचंद्रांच्या स्थानावर जाऊन शिव छत्रपतींच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी आणि महाराष्ट्रात राहून देखील हिंदुत्व हाती घेता येत. हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानाला पटवून देत अनोखा पायंडा पाडावा.
मुंबई महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर हिंदूंना जेंव्हा राज ठाकरे यांची भूमिका पटेल तेंव्हा ते राज ठाकरे यांच नेतृव स्वीकारतीलच. यानंतर जर उत्तर प्रदेश मधून आदरपूर्वक निमंत्रण आले तर तिथेही त्यांनी जरूर जाऊन यावे.
विरोधकांनी रचलेल्या या षड्यंत्राचे सोने करून राज ठाकरे यांनी शिव छत्रपतींचा इतिहास गिरवून महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हिंदू राजकारणाचा इतिहासच बदलावा हीच अपेक्षा आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र...
©मिलिंद पालांडे©